२५० वर्षे प्राचीन असे आपल्या ठाणे शहरातील घंटाळी देवी मंदिर हजारो भाविकांचे जिव्हाळ्याचे श्रद्धास्थान आहे. ई स १८७९ च्या राजपत्रानुसार ठाण्यातील ९ प्राचीन मंदिरात श्री कौपिनेश्वर मंदिरासह शक्ती देवता घंटाळी देवीच्या मंदिराचा उल्लेख आहे. तत्कालीन सरकार कडून या मंदिराला दर वर्षी ४ रुपये वर्षासन मिळत असल्याचा उल्लेख राजपत्रात सापडतो.रावसाहेब केशवराव भास्करजी कोठारे यांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते व त्यांनतर २०२३ अखेरी पर्यंत ठाकूरद्वाराचे झावबा यांच्या ताब्यात हे मंदिर होते.परंतु सदर मंदिर हे खाजगी मालकीचे असल्याने व तत्कालीन वारसदारांना वयोपरत्वे दगदग झेपत नसल्याने त्यांनी मंदिर वास्तू विकण्याचा निर्णय घेतला आणि ठाण्यातीलच ३० वर्षे जुन्या हिंदू जागृती न्यासाने ही वास्तू विकत घेण्याचे निश्चित केले. १० नोव्हेंबर २०२३ रोजी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर हिंदू जागृती न्यासाने लोकवर्गणी उभारून हे मंदिर वास्तू खरेदी केले आहे. घंटाळी देवी मंदिर आणि हिंदू जागृती न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारचे अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम चालविले जात आहेत. ज्यात प्रामुख्याने आश्रमशाळांना अन्नदान, पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गांव पाड्यांना पाणी व्यवस्था, अंधारमुक्त सोलर ग्राम व वनवासी भागातील कुपोषित बालक व गर्भिणी स्तनदा मातांना पोषक पूर्णान्न बिस्कीट,आहार आदि उपक्रम चालू आहेत.